अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे – विवेकभैय्या कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विजेचे खांब आणि झाडे कोसळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून, अनेक घरांची पत्रे उडाली आहेत. कांदा, गहू आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सुदैवाने या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी झाली नाही, परंतु नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे की, सर्व बाधित भागांची तात्काळ पाहणी करून अधिकृत पंचनामे करावेत.

शासन स्तरावरून नुकसानग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना त्वरेने आर्थिक मदत आणि भरपाई देण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे.यावेळी विवेकभैय्या कोल्हे यांनी पुढे सांगितले की, या नैसर्गिक संकटामुळे अनेक कुटुंबांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी, उद्ध्वस्त घरे आणि शेतजमिनींच्या दुरुस्तीच्या कामांना गती देण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवाव्यात. जनतेला आधार देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.
कोपरगाव मतदारसंघातील नागरिक आणि शेतकरी यांना झालेल्या नुकसानाची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी. मोठ्या कष्टाने उभी केलेली पिके काढणीला आलेली असताना झालेले नुकसान हे वेदनादायक असते त्यामुळे शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाला पाठवण्यासाठी प्रशासनाने कार्यवाही करावी असेही शेवटी कोल्हे म्हणाले आहेत.