कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतीना नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्याअंतर्गत तात्काळ पिण्याचे पाणी द्यावे –मा.आ.स्नेहलता कोल्हे यांची मागणी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतीना तातडीने पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापूर यांच्याकडे केली आहे.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनांत पुढे म्हटले आहे की, नांदुर मध्यमेश्वर पाटबंधारे विभागांतर्गत उन्हाळी हंगामात पिण्यांचे पाण्यांचे आरक्षणाचे प्रकटन कार्यकारी संचालक व छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत २२ एप्रिल २०२५ रोजी प्रसिध्द करण्यांत आले. वैजापुर, गंगापुर व कोपरगाव तालुक्यातील गावांना जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली २८ फेब्रुवारी २०२५ रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक घेण्यांत आली त्यात आकस्मीत पाणी आरक्षण आदेशान्वये मे महिन्यात नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यास उन्हाळी हंगाम पिण्यांचे पाण्यांचे आर्वतन सोडण्यांत आले.त्याप्रमाणे कोपरगांव तालुक्यातील लाभक्षेत्रातील ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्यांची मागणी केली तर संबंधीत नांदुर मध्यमेश्वर पाटबंधारे उपविभागाने पाणी देता येणार नाही म्हणून कळविले आहे.कोपरगाव तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या ग्रामपंचायतींनी पिण्याच्या पाण्याची मागणी केल्यानंतर पाणी देता येणार नसल्याचे कळविले, हे अत्यंत दुर्दैवी आहे. यासंदर्भात सौ. कोल्हे यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की,

या कालव्याचा लाभ फक्त वैजापूर आणि गंगापूर प्रमाणे कोपरगाव तालुक्याला देखील मिळावा.कारण कोपरगाव तालुक्यातील नागरिक देखील याच कालव्याच्या लाभक्षेत्रात राहत असताना त्यांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवणे अन्यायकारक ठरेल.हा दूजाभाव ठरू नये याचा विचार होणे गरजेचे आहे.तसेच, कोपरगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांनी यामध्ये तत्काळ लक्ष घालावे व छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता (नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा, वैजापूर) यांना कोपरगावसाठी पाणी सोडण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.सर्व तालुक्यांना समान न्याय मिळावा, एकाच कार्यक्षेत्रातील गावांवर अन्याय होता कामा नये, हेच लोकशाही मूल्य आहे, असेही सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी आपल्या निवेदनाच्या शेवटी नमूद केले आहे.