विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अर्थखात्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या आणि अर्थसंकल्प मांडतांना नेहमीच सर्वच घटकांना न्याय देण्याची परंपरा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी राज्याच्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतांना याहीवेळेस जपली असून विविध क्षेत्रांना प्रोत्साहन देणारा आणि महाराष्ट्राला समृद्धीची दिशा दाखवणारा अर्थसंकल्प असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी त्यांच्या राज्य मंत्रीमंडळाच्या कार्यकाळातील अकरावा अर्थसंकल्प मांडतांना का आम्हाला मिळाली सत्ता याची जान आहे, करायचे काय याचे भान आहे या ओळीप्रमाणे राज्याच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा अर्थसंकल्प मांडला आहे. यामध्ये महिला, शेतकरी, उद्योजक, व्यापारी, युवा वर्ग अशा सर्वच घटकांना न्याय दिला आहे. कृषी विभागासाठी ९७१० कोटीची तरतूद करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याबरोबरच ४५ लाख कृषी पंपांना मोफत वीज, शेतकऱ्यांना पीक नियोजनाचा सल्ला देणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, दर्जेदार शेतमालाचे उत्पादन तसेच शेतमालाला हक्काची व शाश्वत बाजारपेठ मिळवून देणे यासाठी शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रात उपयुक्त असलेल्या प्रणाली शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी “कृत्रिम बुध्दिमत्ता” तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार निर्णय स्वागतार्ह आहे. कोपरगाव मतदार संघातील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमान तळावर नाईट लँडींग सुविधा सुरु होणार असल्यामुळे दळणवळण आणि पर्यटनाला चालना मिळणार आहे. कोपरगाव मतदार संघ पर्जन्यछायेखाली येत असून मतदारसंघात पर्जन्यमान नेहमीच कमी असते. त्यामुळे अतिवृष्टी किंवा कमी पर्जन्यमान होवूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यात अडचणी येत होत्या तसेच शासनाच्या विविध योजना व अनुदानाचा फायदा काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळत नसल्यामुळे नुकसानीच्या अचूक माहितीसाठी मतदार संघात स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढवावी यासाठी माझा पाठपुरावा सुरु होता. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारणार हा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अतिवृष्टी किंवा दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीपासून एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही.मुघलांच्या नजरकैदेतून आग्र्याहून सुटका हा शिवचरित्रातील समस्त देशवासीयांसाठी प्रेरणादायी प्रसंग आहे. ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत होते त्याठिकाणी भव्य स्मारक उभारण्याचे राज्य शासनाने ठरविले असून त्यासाठी उत्तर प्रदेश शासनाच्या सहकार्याने जागा उपलब्ध करुन घेण्यात येणार आहे. येणाऱ्या पिढ्यांना शिवरायांच्या स्फुर्तीदायी चरित्राची ओळख अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आधारे करुन देण्यासाठी पुणे शहरातील आंबेगांव येथे चार टप्प्यात भव्य शिवसृष्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. त्यातील दोन टप्प्यांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम गतीने होण्यासाठी राज्य शासनाकडून आणखी ५० कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळविणाऱ्या स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक उभारणीसाठी तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याचे काम सुरु असून त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.अनुसूचित जाती उपाययोजनेच्या तरतुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४२ टक्के एवढी भरीव वाढ करण्यात आली आहे.आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, नमो आदिवासी स्मार्ट शाळा अभियान, आदर्श आश्रमशाळा, ठक्करबाप्पा आदिवासी विकास योजना तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयम् योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, विद्यानिकेतन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना, तांडा वस्तीमुक्त वसाहत योजना आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे असे अनेक महत्वाचे निर्णय उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मांडतांना घेतले आहेत.कृषी, सिंचन, आरोग्य, क्रीडा, ग्रामविकास, नगरविकास, ऊर्जा, सांस्कृतिक, पर्यटन आदी सर्व विभागासाठी निधीची तरतूद असलेला विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आ. आशुतोष काळे यांनी आभार मानले आहे.