क्रीडा शिक्षक व मार्गदर्शकांचा आ. आशुतोष काळेंच्या हस्ते सत्कार संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
एकेकाळी कोपरगावला व्हॉलीबॉलचे माहेघर म्हटले जायचे. याच कोपरगाव तालुक्याने अनेक गुणवंत खेळाडू व प्रशिक्षक या राज्याला दिले आहे. हि परंपरा पुढे सुरु ठेवून कोपरगावचे खेळाडू राज्य व देशपातळीवर चमकले पाहिजे यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केली.
कोपरगाव तालुक्याच्या सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षासाठी नवनियुक्त तालुका क्रीडा समिती जाहीर करण्यात आली असून सलग तिसऱ्या वर्षी समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्या मंदिरचे क्रीडा शिक्षक नितीन निकम यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली त्यांचा व उपस्थित समिती सदस्य यांचा तसेच २०२४-२५ मध्ये निवृत्त झालेले क्रीडा शिक्षक बेसबॉल जिल्हा असोसिएशनचे सदस्य मकरंद कोऱ्हाळकर, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र पाटणकर,ज्येष्ठ मार्गदर्शक नारायण शेळके, चंद्रकांत शेजुळ, ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक यांचा कोपरगाव येथील गौतम बँकेच्या सभागृहात आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा शारीरिक शिक्षण महासंघाचे अध्यक्ष अरुण चंद्रे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दिलीप घोडके, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक अंबादास वडांगळे, विद्यापीठ कर्णधार सुभाष पाटणकर उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, खेळाडूंसाठी शासकीय स्तरावर जे काही निर्णय घेतले जातात त्याची प्रभावीपणे अंमबजावणी क्रीडा शिक्षकांनी करावी. कुठलाही खेळाडू स्पर्धेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेवून खेळाडूंना चांगले मार्गदर्शन करून विजयी खेळाडू व संघाना जिल्हा, राज्य व देशपातळीवर संधी मिळावी यासाठी प्रयत्न करावे. खेळाडूंना चांगले मैदान तयार करून द्यावे जेणेकरून त्यांना सराव करतांना अडचणी येणार नाही. तालुकास्तरावरील प्रत्येक शाळेत मैदान असावे.तालुका स्तरावर स्पर्धांचे आयोजन करतांना एकोप्याने,एक दिलाने, नि:पक्षपातीपणे निकोप वातावरणात खिलाडूवृत्तीने या स्पर्धा पार पाडाव्यात. शाळेतील १० वी व १२ वीच्या खेळाडूंना अधिकचे गुण दिले जातात. असे खेळाडू राज्य व देशपातळीवर खेळले पाहिजे यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. कोपरगाव तालुक्याचा क्रीडा क्षेत्रात मोठा लौकिक असून तो उत्तरोत्तर वाढत जाण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनस्तरावर खेळाडू व क्रीडा क्षेत्रासाठी जे काही करता येईल त्यासाठी माझे प्रयत्न राहतील अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित क्रीडा शिक्षकांना दिली. याप्रसंगी नवनियुक्त समिती उपाध्यक्ष-सुधाकर निलक, निलेश बडजाते, संजय अमोलिक, अजित पवार, सचिव-अनुप गिरमे, सहसचिव-रविंद्र नेंद्रे, मिलिंद कांबळे, देवेंद्र भोये, संघटना प्रतिनिधी-आकाश लकारे, भीमाशंकर औताडे, समिती सदस्य-अशोक गायकवाड, राजेंद्र देशमुख, शिवराज पाळणे, वीरूपक्ष रेड्डी, किरण बोळीज, रामदास गव्हाणे, महिला प्रतिनिधी- कु.अस्मिता रायते,जिल्हा समन्वयक व जिल्हा संपर्कप्रमुख- शिवप्रसाद घोडके आदी उपस्थित होते.