वरुणराजाची गोदावरी लाभक्षेत्रावर कृपा पाटबंधारे विभागाने आपले कर्तव्य बजवावे-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रावर समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे दरवर्षी असलेली टांगती तलवार यावर्षी वरुणराजाच्या कृपेमुळे दूरू झाली आहे.२०२० नंतर पुन्हा एकदा जायकवाडी धरण जुलै महिन्यातच ६५ टक्के भरले आहे.त्यामुळे अहिल्यानगर व नासिक जिल्ह्यातील गोदावरी कालव्याच्या लाभधारक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु आता पाटबंधारे विभागाची जबाबदारी वाढली असून पावसाळ्यात ओव्हर फ्लोच्या पाण्यातून गोदावरी कालवे जास्तीत जास्त दिवस कसे प्रवाहित राहतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून आपले कर्तव्य चोखपणे पार पाडावे असे आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.सध्या मुंबई येथे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून आ.आशुतोष काळे या अधिवेशनासाठी उपस्थित असले तरी मे व जून महिन्यापासून आजतागायत धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पडत असलेला पाऊस त्यामुळे नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात जमा होणाऱ्या पाणी साठ्याच्या आकडेवारीवर त्यांचे बारीक लक्ष होते. धरण क्षेत्रात पर्जन्यवृष्टी तर गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रात पावसाने उघडीप दिल्यामुळे गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांना त्यांनी पत्र देखील दिले आहे. अन्यायकारक समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाचा पाणी साठा ६५ टक्के झाला आहे. त्यामुळे गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेती आणि शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून असणाऱ्या नासिकच्या धरणातून जायकवाडीला जाणारे पाणी कमी करून हे पाणी पूर्ण क्षमतेने गोदावरी कालव्यांना सोडण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण नाही.

एक जूनपासून आजतागायत नासिक जिल्ह्याच्या धरणातून नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीमार्गे जायकवाडी धरणात २७.१० टी.एम.सी.पाणी वाहिले असून जायकवाडी धरणाचा जिवंत पाणी साठा बुधवार (दि.०९) रोजी सकाळी ६.०० वाजता ६३.१७ टक्के एवढा झाला आहे. नासिक जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात आजही आषाढ सरींचे तांडव सुरूच असून दारणा, गंगापूर धरणाचा जवळपास ७५ ते ८० टक्के पाणी साठा नियंत्रित करून सद्य स्थितीत ३२,६९० क्युसेक्सने नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु असून बुधवार (दि.०९) रोजी रात्री बारापर्यंत जायकवाडी धरण निश्चितपणे ६५ टक्के भरले जाणार आहे. त्यामुळे यापुढे ओव्हर फ्लोचे पाणी नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत न सोडता ते पाणी पावसाळा सुरु असे पर्यंत गोदावरी कालव्यांना सोडावे. तसेच पालखेड डाव्या कालव्याच्या लाभ क्षेत्रातील कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सर्व गावतळे, साठवण बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्यावीत. त्यामुळे गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील खोलवर गेलेली भूजलपातळी वाढली जावून शेतकऱ्यांच्या चिंता मिटणार आहे.मागील पाच वर्षानंतर पुन्हा एकदा जुलै महिन्यातच जायकवाडी धरण ६५ टक्के भरल्यामुळे यावर्षी समन्यायीची टांगती तलवार दूर झाली हि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे. मागीलवर्षी प्रमाणे याहीवर्षी गोदावरी कालव्यांना जास्तीत जास्त आवर्तन कसे देता येईल यासाठी पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.जोपर्यंत कालव्यांना ओव्हर फ्लोचे पाणी सुरु आहे तोपर्यंत पाटबंधारे विभागाने कालव्यांच्या दुरुस्तीची पळवाट काढू नये. ओव्हर फ्लोचे पाणी सुरु राहिल्यास पाण्याचा अंदाज येवून शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्यावर पुढील पिकांचे नियोजन करणे शक्य होणार आहे. त्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.हे लाभधारक शेतकऱ्यांच्या बाजूने सकारात्मक आहेत. त्याचबरोबर पाटबंधारे विभागाने देखील आपले कर्तव्य अचूक पार पाडावे असे आ.आशुतोष काळे यांनी शेवटी म्हटले आहे.