आ.आशुतोष काळेंच्या हस्ते प्र. क्र. ४ व ७ मध्ये १.३३ कोटीच्या विकास कामांचा शुभारंभ

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
वर्षानुवर्षे रस्त्यांची दुरावस्था आणि मूलभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे कोपरगाव शहरातील प्रभाग क्र. ४ व ७ मधील नागरिक त्रस्त झाले होते. नागरीकांना होणाऱ्या अडचणींची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी दिलेल्या १.३३ कोटी निधीतून करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांचे भूमिपूजन नुकतेच आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये प्रभाग क्र. ४ मध्ये महिला महाविद्यालय ते श्री बिरोबा मंदिर, औताडे घर ते नवीन शर्मा घर तसेच नविन शर्मा घर ते गारदा नाला याठिकाणी भूमिगत गटार करणे. सोळसे घर ते शंकर वाघ घर, मैंद घर ते नवनाथ हुसळे घर पेव्हिंग ब्लॉक बसवणे,कालिकानगर फरताळे दुकान ते सुकदेव कोळगे,वडांगळे घर ते शेखर रहाणे व सातपुते घर ते घेमूड घर ते काळे घर रस्ता करणे. प्रभाग क्र. ७ मध्ये बिस्मिल्ला हॉटेल ते खंदक नाला व अस्लम शेख वखार ते जब्बार कुरेशी घर भूमिगत गटार करणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले.यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, शहराचा सर्वांगीण विकास हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक नागरिकास मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पाणी आणि वीज यांसारख्या बाबतीत कोणताही भाग दुर्लक्षित राहू नये यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.

विकासाच्या प्रत्येक टप्प्यात जनतेचा सहभाग अत्यंत आवश्यक असून जेवढा शाश्वत व नियोजनबद्ध विकास होईल तेवढेच भविष्यातील पिढ्यांचे आयुष्य सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. नेहमीच सर्वसामान्य माणसाच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवून नागरीकांना आवश्यक असणाऱ्या सर्वच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देवून उद्याच्या समृद्ध कोपरगावच्या दिशेने शहराची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.विकास कामांच्या शुभारंभामुळे प्रभाग क्र. ४ व ७ मधील नागरीकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले असून प्रथमच एवढ्या व्यापक प्रमाणावर विकास होत असल्याचे सांगितले. ह्या विकासकामांमुळे नागरी सोयीसुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. या विकास कामांचा नागरिकांना मोठा फायदा होणार असून हा भाग आदर्श प्रभाग म्हणून ओळखला जाईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.