बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी – स्नेहलता कोल्हे यांनी हॉस्पिटल मध्ये जाऊन केली चौकशी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
येसगाव (ता. कोपरगाव) येथे बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय कुणाल अजय आहेर हा चिमुकला गंभीर जखमी झाला. ही धक्कादायक घटना सकाळी नऊ वाजता घडल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कुणाल याला बिबट्या उसाच्या शेतात खेचून नेत असताना वाचवण्यासाठी त्याचे आजोबा मच्छिंद्र आहेर यांनी मोठे धाडस दाखवत बिबट्यावर झडप घातली आणि त्याला पळवून लावले. त्यांच्या शौर्यामुळे बालकाचा जीव वाचला असून, संपूर्ण गावात त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे.घटनेची माहिती मिळताच माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी फडके हॉस्पिटल, कोपरगाव येथे जाऊन जखमी बालकाची व त्याच्या कुटुंबियांची भेट घेतली व तब्येतीची चौकशी केली. डॉक्टरांशी चर्चा करत उपचाराबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांना, जखमी बालकाच्या कुटुंबीयांना त्वरित मदत करण्यास सांगण्यात आले.या घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलताना स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव मतदारसंघात ज्या भागांमध्ये बिबट्याचा संचार असल्याच्या तक्रारी आहेत, त्या ठिकाणी तात्काळ पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे.

बिबट्याच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून, प्रशासनाने या बाबत तातडीने आणि प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे अशी चर्चा केली.ही घटना दिवसाच्या उजेडात घडली असली, तरी रात्री अशा घटना अधिक धोकादायक ठरतात. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहावे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी डॉ.रोशन डागा,कोपरगाव वनपाल भगवानराव जाधव,वनरक्षक प्रतीक गजवार,वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोडे,वनरक्षक राहता एस एस साखरे,कोपरगाव वनरक्षक ए एल किंकर,संतोष सुरासे,मुलाचे आजोबा मच्छिंद्र आहेर, वडील अजय आहेर, आई उज्वला आहेर,सरपंच पुंडलिक गांगुर्डे, माजी ग्रामपंचायत सदस्य शंकर पवार,संदीप गोदावरे,संदीप जाधव,अमोल पवार,कैलास पवार आदींसह ग्रामस्थ नागरिक उपस्थीत होते.