रिकाम्या जागा उपयोगात आणून कोपरगाव शहराच्या वैभवात भर घालणारे उद्यान व व्यापारी संकुल उभारणार -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरात इरिगेशन विभाग व इतर विभागाच्या मालकीची जागा विनावापर पडून आहे. या रिकाम्या जागेचा सदुपयोग करून या जागेत शहराच्या वैभवात भर घालणारे उद्यान व सुसज्ज व्यापारी संकुल उभारणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे एका जाहीर कार्यक्रमात सांगितले आहे.आ.आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या ५.२८ कोटी निधीतून नाबार्ड पायाभूत विकास योजनेअंतर्गत कोपरगाव शहरातील इरिगेशन बंगला येथे ३००० मे. टन क्षमतेच्या शासकीय धान्य गोदामाच्या इमारतीचे भूमिपूजन सोमवार (दि.२६) रोजी आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळातील ब्रिटीशकालीन असलेल्या कोपरगाव तालुक्यातील जनतेला रेशनवर धान्य पुरवठा करणाऱ्या धान्य गोदामची अत्यंत दुरावस्था झाली होती त्यामुळे धान्याचे नुकसान व वितरण व्यवस्थेत अडचणी येत होत्या. स्वातंत्र्यपूर्व काळात सद्य लोकसंख्येनुसार उभारण्यात आलेल्या या धान्य गोदामाची साठवण क्षमता कमी असल्यामुळे जुन्या धान्य गोदामाची ईमारत उभारून बऱ्याच वर्षांचा कालावधी झाल्यामुळे वेळेत पर्यायी इमारत उभी करणे आवश्यक होते. अन्यथा जुन्या धान्य गोदामाच्या इमारतीमध्ये ठेवण्यात आलेल्या धान्याचे नुकसान होणार होते. त्यासाठी शासन दरबारी केलेल्या प्रयत्नातून ३००० मे. टन क्षमतेच्या शासकीय धान्य गोदामाच्या इमारतीसाठी ५.२८ कोटी निधी मंजूर करून आणला आहे. ज्या ठिकाणी नवीन धान्य गोदाम होत आहे त्या ठिकाणी इरिगेशन विभाग व इतर विभागाच्या मालकीची जागा विनावापरवाना पडून आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या ईमारती देखील जीर्ण झालेल्या आहेत.

त्या सर्व इमारतींचे निर्लेखन करून या जागेवर नवीन इमारतीची निर्मिती करतांना जवळून जाणाऱ्या ७५२ जी या राष्ट्रीय महामार्गाचा उपयोग करून घेवून खाली व्यापारी संकुल व त्यावर शासकीय कार्यालयाच्या ईमारती उभ्या करण्याचा मानस आ. आशुतोष काळे यांनी यावेळी बोलून दाखविला. तसेच लहान मुलांसाठी व ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी विकसित सर्व सुविधायुक्त उद्यान उभारण्याचा मनोदय देखील आ. आशुतोष काळे यांनी बोलून दाखवत त्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.यावेळी तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, चंद्रशेखर कुलथे, पुरवठा अधिकारी अमोल फोफसे, मंडलाधिकारी मच्छिन्द्र फोपळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वर्षराज शिंदे, कनिष्ठ अभियंता रविंद्र चौधरी, गौरव सोनवणे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण,जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती, सदस्य आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.