नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही त्यासाठी योग्य उपाय योजना करा –आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघात मागील वर्षी चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान झाले असले तरी मतदार संघातील काही गावात नागरीकांच्या व पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे. हि टंचाई दूर करून नागरीकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवणार नाही यासाठी योग्य उपाययोजना करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी प्रशासनाला केल्या आहेत.कोपरगाव तहसील कार्यालयात आ.आशुतोष काळे यांनी टंचाई आढावा बैठक घेवून विविध विभागाचा आढावा घेतांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे यांनी सांगितले की, मतदार संघात मागील वर्षी चांगल्या प्रकारचे पर्जन्यमान झाल्यामुळे मतदार संघात पाणी टंचाई जाणवणार नाही अशी परिस्थिती होती. परंतु फेब्रुवारी महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणात उन्हाळ्याच्या झळा जाणवू लागल्यामुळे पाणी टंचाई निर्माण झाली असली तरी नागरीकांना पाणी टंचाईची झळ बसू देणार नाही.सातत्याने पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या जिरायती भागातील जवळके, शहापूर, बहादराबाद, बहादरपूर वगळता बहुतांश गावांमध्ये निळवंडेचे पाणी पोहोचले आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत नाही. पालखेड कालव्याच्या लाभक्षेत्रातील उक्कडगाव, शिरसगाव, तिळवणी, सावळगाव, आपेगाव या गावांना ओव्हरफ्लोचे पाणी मिळाले मात्र त्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी न दिल्यामुळे या गावांमध्ये पाणी टंचाई जाणवत आहे. त्याबाबत जलसंपदा मंत्र्यांकडे पालखेड डाव्या कालव्याच्या अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहे. त्याचबरोबर पालखेड, एक्स्प्रेस तसेच उजव्या-डाव्या कालव्याच्या पाण्यावर लाभक्षेत्रातील गावांचे आरक्षण मिळण्याबाबतचे प्रस्ताव ग्रामपंचायतींनी तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याबाबत पाठपुरावा करू. येत्या काळात निर्माण होणारी पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीने उपाय योजना करा. ज्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही व टँकर सुरु करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी पंचायत समितीला उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. ज्या गावांनी आपल्या अडचणी मांडल्या त्याबाबत प्रस्ताव द्या जेणेकरून त्या अडचणी लवकरात लवकर सोडविल्या जातील. उष्णता वाढतच चालली आहे त्यामुळे टंचाई जाणवणार नाही अशा अपेक्षा होत्या परंतु आता टंचाई निवारण करण्यासाठी तहसील. पंचायत समिती प्रशासनाने योग्य नियोजन करून प्रभावी उपाय योजना कराव्यात.

नागरीकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.यावेळी तहसीलदार महेश सावंत, नगरपरिषद मुख्याधिकारी सुहास जगताप, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते, गटविकास अधिकारी संदीप दळवी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अशोक लोहारे, गोदावरी डाव्या कालव्याचे उपविभागीय अभियंता संदीप पाटील, उजव्या तट कालव्याचे उपविभागीय अभियंता संभाजीराव पाटील, वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे, डी.डी. पाटील, पशु संवर्धन अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनराव काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास केकाण, विष्णु शिंदे, वाल्मिक कोळपे, राजेंद्र खिलारी, देवचंद कडेकर, महेंद्र काळे, संतोष चवंडके, विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.