परतीच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आ.आशुतोष काळेंची शेतकऱ्यांच्या बांधावरून तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
दोन दिवसापासून कोपरगाव मतदार संघात पडत असलेल्या परतीच्या मुसळधार पावसामुळे मतदार संघातील अनेक गावातील शेतकऱ्यांना फटका बसला असून सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची आ.आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत.चालू वर्षी कोपरगाव विधानसभा मतदार संघात पर्जन्यमान जेमतेमच झाले असले तरी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस होवून सर्व धरणे भरलेली आहेत. शेतकऱ्यांनी पडलेल्या अत्यल्प पावसावर खरीपाची पेरणी करून पिके उभी केली होती. जरी मोठे पाऊस झाले नसले तरी अधून मधून पडणाऱ्या पावसाने यावर्षी खरीप हंगामातील पिके जोमदार होती. परंतु पुन्हा एकदा हवामानाच्या लहरी पणाचा फटका मतदार संघातील खरीप पिकांना बसला आहे. सलग दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे व बुधवार (दि.२५) रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मतदार संघातील काही गावातील काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी, मका, कापूस तसेच भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले आहे.सदरच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी गुरुवार (दि.२६) रोजीचे आपले पूर्व नियोजीत सर्व कार्यक्रम रद्द करून सकाळीच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जावून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देवून आपण यापूर्वी देखील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळवून दिलेली आहे. त्यामुळे या नुकसानीची देखील भरपाई मिळवून देवू अशी ग्वाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली. त्याच ठिकाणाहून तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्याशी संपर्क साधत झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवा अशा सूचना केल्या.