खऱ्या भक्तीत परमेश्वरही आपलासा होतो – साध्वी सोनालीदिदी कर्पे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शबरी आदिवासी भिल्ल समाजाची होती पण तिची सेवा मनापासून होती, रामाची ती आवडती भक्त होती, तेव्हा आपली भक्ती ही खरी असावी त्यात परमेश्वर देखील आपलासा होतो असे प्रतिपादन साध्वी सोनालीदिदी कर्पे यांनी केले.
शहरातील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या तिस-या पुण्यतिथीनिमीत्त कल्याणस्वामी संस्थान चकलंबा (गेवराई-बीड) अन्नपुर्णा माता मुलींची वारकरी शिक्षण संस्थेच्या संस्थापिका, साध्वी सोनालीदिदी कर्पे यांच्या रसाळवाणीतुन संगीतमय प्रभु श्रीरामकथेचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे अखेरचे सातवे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. महंत नारायणगिरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन व्यासपीठावर पार पडले, माजी आमदार स्नेहलता कोल्हे व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, श्रीमती सिंधुताई कोल्हे यांच्या हस्ते रामायणग्रंथाचे व गुजरात येथील लड्डू गोपाल गोशाळेचे संस्थापक परमपूज्य महंत हरी जीवनदास शास्त्री तसेच डॉ. यशराज महानुभाव, ब्रह्मकुमारी सरलादीदी, ह. भ. प. सुभाष महाराज जगताप, संगीताताई चव्हाण, लताताई महानुभाव, दत्तराज महानुभाव, सोमनाथ भगत (कसारा मुंबई) शेळके (संभाजीनगर), अण्णा शास्त्री(गुजरात) आदी विविध संत महंतांचे पुजन झाले. महंत हरी जीवनदास शास्त्री याप्रसंगी बोलताना म्हणाले की, सुख दुकानात मिळत नसते ते परमेश्वराच्या चरणाजवळ आहे, भक्तीतून ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. संतांचा सत्संग प्रत्येकाच्या जीवनात महत्त्वाचा आहे, कोपरगाव परिसर संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे, येथे येणे हे आपलं भाग्य आहे, गोदावरी दक्षिणगंगा काठ तुम्हा सर्वांना लाभला आहे, चकलंबा कल्याण स्वामी संजीवन समाधी संस्थांनच्या साध्वी सोनाली कर्पे यांची प्रत्येक सेवा सर्वांना मेवा देणारी आहे.

जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे समाजकार्य व सोनालीदीदी कर्पे यांचे नाव अजरामर राहील. साध्वी सोनाली कर्पे पूढे म्हणाल्या की तरुणवय भरकटत असते वय वर्ष बारा पर्यंत आई-वडील यांनी पाल्य जेथे चुकेल तेथे त्याला शिक्षा केलीच पाहिजे, तरुण मुला-मुलींनी आपल्या आई-वडिलांचे संस्कार जपावे, वय वर्षे बारा ते अठरा आई वडीलांनी त्यांचे मित्र व्हायला पाहिजे, मुला-मुलींशी प्रेमाने वागावे, चुकेल तेथे समजुन सांगावे, सध्या हवेतील प्रदूषणाबरोबरच वैचारिक प्रदूषण वाढले आहे.रामायण कथा-श्रवणाने विचार जपा आणि त्यातून समाजाला संस्कृती शिकवा. कलीयुगात रामनाम तुमच्या आशा, अपेक्षा, आकांक्षा, सत्ता, संपत्ती, संतती, सुख, ऐश्वर्य, स्नेह, भाव, भक्ती, वाढविणारं माध्यम आहे.माजीमंत्री सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट यांनी स्व. शंकरराव कोल्हे यांच्या पुण्यतिथी ते जयंतीनिमीत्त वैचारिक ज्ञान दानाचे कार्य चालू ठेवले आहे ही लाखमोलाची गोष्ट आहे. त्यांची संस्काराची विचारधारा अशीच तेवत राहो, स्व. शंकरराव कोल्हे यांची कार्य प्रेरणा या भागात प्रेरणदिन म्हणून साजरी होत आहे ही बाब देशात नाव लौकिकास्पद आहे. देव, देश आणि धर्म प्रत्येकांने जागवा- हल्ली माणूस माणसापासून दूर जात आहे, त्याचे वैचारीक, मानसिक प्रबोधन करा आणि अध्यात्मातून त्याची कार्यप्रेरणा जागवा निश्चितच याभागाचा आणखी कायापालट घडेल. जग जोडायला प्रेमाचे दोन शब्द लागतात, नाती स्वार्थाने तोडू नका, कुणांशी वाईट वागू नका, आपल्यातील स्नेहभाव वाढवण्यासाठी कमीपणा घ्या, पण त्यातून तुम्ही स्वतःला सावरा म्हणजे सभोवतालचा परिसर आपोआप सावरेल.

सुदर्शन महाराजांनी व्यासपिठावर रामराज्याभिषेकाची सादर केलेली झाकी भाविकांना विशेष आवडली. भाविकांनी गुलाबी वस्त्र परीधान केल्यामुळे व्यासपीठ खुलून दिसत होते. प्रत्येकाच्या हातात पेटत्या मेणबत्तीमुळे धरतीवर साक्षात स्वर्ग अवतरल्याचा आभास जाणवत होता. महिलांसह पुरुष भाविकांची हजारोंच्या संख्येने लक्षणीय उपस्थिती होती. रामराज्याभिषेकाच्या प्रसंगाने रामायण कथेची सांगता झाली. भाविकांना संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सेवकांनी बुंदीच्या लाडवांचा प्रसाद वाटला. शेवटी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी आभार मानले. साध्वी सोनाली कर्पे यांनी कोपरगाव पंचक्रोशीतील भाविकांना कल्याण स्वामी संजीवन समाधी चकलंबा बीड गेवराई येथे येण्याचे निमंत्रण दिले. साध्वी सोनाली कर्पे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेच्या कुमारी परमेश्वरी हिने नवसारी गुजरात येथे कथा केल्याबद्दल तिचा व्यासपीठावर कोपरगाव तालुका स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका विवेक कोल्हे यांनी सत्कार केला.