कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी साथ अशीच राहू द्या-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास हि केवळ राजकीय जबाबदारी नव्हे, तर एक भावनिक बांधिलकी पण आहे. कोपरगाव मतदार संघाबरोबरच कोपरगाव शहराचा विकास साधण्यासाठी मला मिळालेला जनतेचा पाठिंबा, विश्वास आणि सहकार्य हीच माझी खरी ताकद आहे. तुमच्या विश्वासावरच मला कोपरगावचा चेहरा-मोहरा बदलवता आला. कोपरगावचा विकास योग्य दिशेने सुरु असून जनता समाधानी आहे. कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आपली साथ अशीच राहू द्या असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहरातील प्र.क्र.०२ मध्ये १ कोटी ५९ लक्ष रुपये निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.या विकासकामांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती ते नगर मनमाड रस्ता करणे,आढाव वस्ती ते पाण्याची टाकी रस्ता करणे,जानकीविश्व-रिद्धी सिद्धीनगर प्रमुख रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसवणे,जानकी विश्व-श्री म्हसोबा मंदिर पेव्हिंग ब्लॉक बसवणे,गंगा माता मंदिर परिसर पेव्हिंग ब्लॉक बसवणे,आढाव वस्ती पेव्हिंग ब्लॉक बसवणे, संभाजी जाधव घर ते स्वामी समर्थ मंदिर रस्ता पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी कामांचा सामावेश आहे.यावेळी पुढे बोलतांना म्हणाले की,कोपरगाव शहरात मागील पाच वर्षात झालेल्या विकास कामांमुळे जनता समाधानी आहे. सर्व सामान्य जनता व विशेषतः महिला भगिनींना भेडसावणारा पाणी प्रश्न पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून सुटला असून नागरीकांना तीन ते चार दिवसांनी नियमितपणे पाणी मिळत आहे परंतु कोपरगावच्या नागरिकांना दररोज पाणी कसे मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरु असून त्यामध्ये यश देखील मिळणार आहे.

कोपरगाव शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यासाठी गेल्या काही वर्षांमध्ये राबवलेली विकासकामं ही जनतेच्या विश्वासातून आणि सहकार्यामुळेच शक्य झाली आहेत. शहरातील नागरिकांनी विकासाची दिशा ओळखून वेळोवेळी सहकार्य केल्यामुळे कोपरगाव शहर जिल्ह्यात एक प्रगतशील शहर म्हणून कोपरगाव शहर पुढे येत आहे. यापुढेही आपल्याला कोपरगाव शहरातील अनेक विकास कामे पूर्ण करायची असून स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि विकसित कोपरगाव घडवण्याचा संकल्प पूर्ण करायचा आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी जसा आजपर्यंत तुमचा पाठिंबा माझ्या पाठीशी होता, तसाच तो यापुढेही ठेवावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांना केले आहे.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.