महिलांसाठी घरगुती व्यवसाय प्रशिक्षण शिबीर आर्थिक स्वावलंबनाचा शाश्वत मार्ग-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आजच्या युगात महिलांनी केवळ घरापुरतेच मर्यादित न राहता आर्थिक विकासात सक्रिय योगदान देणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिलांना विविध व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाल्यास त्यांना देखील उद्योजक म्हणून वाटचाल करता येवू शकते. हा उद्दात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून महिलांना स्वत:च्या पायावर उभे करून आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ काम करीत आहे.हि प्रेरणा घेवून सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नवक्रांती स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या वतीने महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी वेळोवेळी आयोजित करण्यात येणारे घरगुती व्यवसाय प्रशिक्षण शिबीर महिलांसाठी आर्थिक स्वालंबनाचा शाश्वत मार्ग असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती स्किल डेव्हलपमेंट सेंटर कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरगाव शहरात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मोत्याची रांगोळी व पाण्यावर तरंगणारे दिवे’ तयार करण्याच्या एकदिवसीय शिबिराचे उदघाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, महिलांमध्ये असलेल्या कलात्मक आणि व्यावसायिक क्षमतेला चालना देण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशिक्षण शिबिराचे असे उपक्रम प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व नवक्रांती स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून राबवले जातात हि अभिमानास्पद बाब आहे. आजच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीत महिलांनी स्वबळावर उभं राहणं हे काळाची गरज आहे.

त्यासाठी कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचं ठरतं. महिलांसाठी आयोजित करण्यात आलेलं घरगुती व्यवसाय प्रशिक्षण शिबीर म्हणजे त्यांना आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने घेऊन जाणारं एक प्रभावी पाऊल आहे ‘मोत्याची रांगोळी व पाण्यावर तरंगणारे दिवे’ तयार करण्याचे हे एकदिवसीय शिबिर महिलांच्या कलागुणांना व्यावसायिक संधीमध्ये रूपांतर करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. या कौशल्य प्रशिक्षणातून महिला केवळ आपली कला विकसित करतील असे नाही, तर ती विक्री योग्य बनवून स्वावलंबनाच्या वाटेवर देखील पुढे जातील व त्या माध्यमातून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.याप्रसंगी नवक्रांती स्किल डेव्हलपमेंट सेंटरच्या संचालिका सौ.राजश्री बागुल, चंद्रकांत बागुल, प्रशिक्षक मयुरी रणभोर, हर्षा पाटील, हेमा तवरेज, किरण बिडवे, यश करिअर अकॅडमीचे प्रमुख वाल्हे आदी उपस्थित होते.