साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजासाठी लढणारे योद्धा -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे एक प्रभावी माध्यम होते. त्यांनी आपल्या लेखणीद्वारे आणि काव्याच्या माध्यमातून वंचित, शोषित, आणि उपेक्षित घटकांच्या व्यथा जगासमोर मांडल्या. अण्णाभाऊ साठे हे फक्त साहित्यिक नव्हते, तर ते समाजासाठी लढणारे योद्धा होते असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले.याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे समाजाच्या तळागाळातून आलेले थोर साहित्यिक आणि क्रांतिकारक होते. त्यांनी आपल्या लेखणीला शस्त्र बनवून वंचित, शोषित आणि उपेक्षित जनतेच्या वेदना शब्दांतून मांडल्या. त्यांच्या कथा, कविता आणि गीतांमध्ये दुःख आहे, संघर्ष आहे, पण त्याहून अधिक आशा आणि परिवर्तनाची जिद्द आहे. ते साहित्यिक, समाजसुधारक आणि क्रांतीचे प्रतीक होते. अण्णाभाऊ साठे हे कामगार, शेतकरी आणि उपेक्षितांच्या हक्कासाठी लढणारे खरे जनकवी होते. त्यांच्या विचारांची आजही तितकीच गरज असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.