कोपरगाव शहरात झालेल्या विकासामुळे बाजारपेठेची आर्थिक उलाढाल वाढविण्यात यश – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराच्या विकासाच्या समस्या सोडविण्यात यशस्वी होवून कित्येक दशकापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच रस्त्यांचे प्रश्न देखील सुटले आहेत. कोविडच्या काळापासून ऑनलाईन संस्कृती तर वाढली आहेच. परंतु त्याच बरोबर मागील काही वर्षापासून मॉल संस्कृती देखील मोठ्या प्रमाणात वाढत चालली असतांना देखील कोपरगाव शहरात झालेल्या विकासामुळे कोपरगावच्या बाजार पेठेची आर्थिक उलाढाल वाढविण्यात यश आले असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले.कोपरगाव नगरपरिषद इमारतीसमोर ३.३६ कोटी रुपये निधीतून उभारण्यात येणाऱ्या भव्य व्यापारी संकुलाचे भूमिपूजन नुकतेच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून बस स्थानक परिसरात व्यापारी संकुल उभारण्यासाठी १४ कोटी रुपये निधी आणला आहे. या व्यापारी संकुलाचे जवळपास ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामही लवकरच पूर्ण होईल.कोपरगाव नगरपरिषदेच्या व्यापारी संकुलासाठी ३.३६ कोटी निधी तसेच बाजार तळावरील व्यापारी संकुलासाठी एक कोटी निधी आणला आहे.कोपरगाव शहरात ज्या ज्या ठिकाणी कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या जागा व्यवसायासाठी अनुकूल आहेत त्या त्या ठिकाणी व्यापारी संकुल उभारणार. – आ.आशुतोष काळे.
ते पुढे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघातील प्रत्येक गावाप्रमाणे कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पाचशे कोटीचा निधी दिला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्याचा दिलेला शब्द पूर्ण करून पाच नंबर साठवण तलावाचे कोपरगावकरांच्या खिशाला झळ बसू न देता काम पूर्ण केले. त्यामुळे आज रोजी कोपरगाव शहराला तीन दिवसा आड पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे मागील कित्येक दशकांपासून पाण्यासाठी कोपरगावकरांची विशेषता माता-भगिनींची होणारी वणवण कायमची थांबली आहे. मागील वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत कोपरगाव मतदार संघासह शहरातील मतदारांनी मला सव्वा लाखाच्या मताधिक्याने निवडून देऊन माझी जबाबदारी अधिक वाढवली याची मला जाणीव आहे. विकासकामांसाठी पाहिजे तेवढा निधी देतो परंतु एका विकास कामासाठी मिळणारा निधी हा वारंवार मिळत नाही.

त्यामुळे मिळालेल्या निधीतून चांगल्या दर्जाची कामे होणे अपेक्षित असून ती कामे दीर्घकाळ टिकली पाहिजे व नागरीकांना देखील त्याचा उपभोग दीर्घकाळ घेता आला पाहिजे यासाठी कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने योग्य काळजी घ्यावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केल्या.यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी महासंघ, क्रेडाई, डॉक्टर्स असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिशन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.