चार-पाच नंबर साठवण तलाव जोडणी काम जलद गतीने पूर्ण करा-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील नागरीकांना नियमित पाणी मिळावे यासाठी सुरु असलेल्या चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीचे काम तातडीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना व सबंधित ठेकेदारास दिल्या आहेत.आ.आशुतोष काळे यांच्या भगीरथ प्रयत्नातून पाच नंबर साठवण तलावाची निर्मिती झाली. त्यामुळे कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एक ते चार साठवण तलावांचा भार हलका होवून नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु नागरीकांना नियमित व पूर्ववत पाणी पुरवठा कसा करता येईल यासाठी आ. आशुतोष काळे यांचा सातत्याने खटाटोप सुरु असून त्या खटाटोपातून चार व पाच नंबर साठवण तलाव जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाचा आ. आशुतोष काळे यांनी नुकताच आढावा घेत माहिती घेतली.ज्याप्रमाणे पाच नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आ. आशुतोष काळे या साठवण तलावाच्या कामावर बारीक लक्ष ठेवून होते त्याप्रमाणेच सुरु असलेल्या चार व पाच नंबर साठवण तलाव जोडणीच्या कामावर ते बारीक लक्ष ठेवून आहेत.

त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष भेट देवून सुरु असलेल्या कामाबाबत माहिती घेत लवकरात लवकर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गुरुवार (दि.०१) पासून गोदावरी कालव्यांना उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या आवर्तनातून सर्वच्या सर्व एक ते पाच साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरून घेण्यासाठी सुरु असलेले काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे. जेणेकरून कोपरगाव शहरातील नागरिकांना नियमित व पूर्ववत पाणी पुरवठा करण्यासाठी चार नं.साठवण तलावातून पाच नं.साठवण तलावात व पाच नं.साठवण तलावातून चार नं.साठवण तलावात पाणी उचलणे सहज शक्य होणार आहे. त्यासाठी हे काम लवकर पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना व सबंधित ठेकेदारास दिल्या आहेत.