दलित वस्ती विकास योजनेच्या ५० लक्ष निधीच्या विविध विकास कामांना प्रशासकीय मान्यता-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
जिल्हा समाजकल्याण विभागांतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास २०२४-२५ योजनेअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध गावातील विकास कामांकरीता ५० लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती शासनामार्फत आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. मतदार संघाच्या झालेल्या विविध विकास कामातून विकसित कोपरगाव अशी ओळख निर्माण करण्यात आ.आशुतोष काळे यशस्वी झाले आहेत. मतदार संघातील विविध विकास कामांना मंजुरी मिळवून त्यासाठी निधी मिळावा यासाठी त्यांचा सातत्याने आटापिटा सुरु असतो. त्या माध्यमातून जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या समाज कल्याण विभागाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी ५० लक्ष रुपयांच्या विकास कामांना प्रशासकिय मंजुरी दिली आहे.यामध्ये धारणगाव गावठाण येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, सुरेगाव रोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे, तसेच निकमनगर येथे रस्ता खडीकरण करणे, वेस-सोयगाव येथील आंबेडकर नगर येथे विज पुरवठा कामे, तसेच भिमनगर येथे बंदिस्त गटार करणे, जेऊर कुंभारी येथील संजयनगर येथे पेव्हिंग ब्लॉक बसविणे, तसेच पवार वस्ती येथील अंतर्गत रस्ता करणे, रांजणगाव देशमुख गावठाण वरील धाकतोडे वस्ती येथे रस्ता कॉंक्रिटीकरण करणे आदी विकास कामांचा समावेश आहे.कोपरगाव मतदार संघाच्या विकासकामांना निधी मंजूर केल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, पालकमंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.