कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाची सांगता

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महाराष्ट्रात सन २००० साली १२८ सहकारी साखर कारखाने व ९ खाजगी साखर कारखाने होते. २५ वर्षात खाजगी साखर कारखान्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून आजमितीला जेवढे सहकारी साखर कारखान्याची संख्या आहे तेवढीच खाजगी साखर कारखान्यांची संख्या झाली आहे. त्यामुळे सहकारी साखर कारखानदारीपुढे खाजगी साखर कारखानदारीचे मोठे आवाहन असून सहकारी साखर कारखानदारीला बदलत्या काळाची पावले ओळखून काळानुरूप बदल करावे लागणार असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या २०२४/२५ च्या ७० व्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे मार्गदर्शक व ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे संचालक अॅड. राहुल रोहमारे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.सोनालीताई रोहमारे यांच्या शुभहस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. याप्रसंगी आ.आशुतोष काळे बोलत होते.पुढे बोलतांना ते म्हणाले की, कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांचे सर्वांगीण हित जोपासण्याच्या आदर्श विचारांवर व कारखान्याचे ज्येष्ठ संचालक व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना अविरतपणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. १२१ दिवस चाललेल्या २०२४-२५ च्या गळीत हंगामात ६ लाख ५८ हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप होवून ७ लाख ३४ हजार ४५० क्विंटल साखर पोती उत्पादन झाले

असून सरासरी साखर उतारा ११.१९ टक्के मिळाला असला तरी गाळप हंगाम नुकताच हंगाम बंद झाल्यामुळे पुढील प्रोसेसिंग सुरु असून अंतिम साखर उताऱ्याची आकडेवारी अंतिम होणे बाकी असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.ते पुढे म्हणाले की, ज्याप्रमाणे खाजगी क्षेत्रामध्ये व्यावसायिक व व्यापारी बदल करणेबाबत त्वरीत निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाते त्याप्रमाणे सहकारी साखर कारखान्याला ऊस उत्पादक शेतकरी, कर्मचारी व कारखान्याच्या निगडीत घटकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेवून निर्णय घ्यावे लागतात. नवीन साखर कारखान्याच्या उभारणीस परवानगी देतांना कारखान्याच्या भागातील ऊस उपलब्धतेची परिस्थिती पाहून उभारणीस मान्यता दिली पाहिजे असे मत व्यक्त करून सहकारी साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक सुधारणांचा पाया घातला जातो याचा विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.किमान १६० दिवसांचा गाळप हंगाम होणे अपेक्षित असतांना गळीत हंगाम आता ९० ते १२० दिवसांचा होत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडत चालले आहे. दैनंदिन स्थीर खर्च कमी होण्यासाठी जास्तीत जास्त ऊस गाळप होणे आवश्यक असून त्यासाठी ऊसाची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरीता ऊस विकासावर भर देऊन कारखान्याच्या कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊस उपलब्धता करणेसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.याप्रसंगी माजी संचालक पद्माकांत कुदळे,कारभारी आगावण,एम.टी.रोहमारे, नारायणराव मांजरे,ज्ञानदेव मांजरे, सिकंदर चांद पटेल, गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन शंकरराव चव्हाण, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, राजेंद्र घुमरे,

सचिन चांदगुडे, सूर्यभान कोळपे, श्रीराम राजेभोसले, प्रवीण शिंदे, अनिल कदम, अशोक मवाळ, सुनील मांजरे, मनोज जगझाप, वसंतराव आभाळे, डॉ.मच्छिंद्र बर्डे, सौ.वत्सलाबाई जाधव, सौ.इंदुबाई शिंदे, दिनार कुदळे, प्रशांत घुले, गंगाधर औताडे, श्रावण आसने, जीनिंग प्रेसींगचे चेअरमन गोरक्षनाथ जामदार,पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, प.स.माजी उपसभापती अर्जुनराव काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोवर्धन परजणे, गौतम सहकारी कुक्कुटपालनचे चेअरमन विजयराव कुलकर्णी,चांगदेवराव आगवण, सुनील शिंदे, मीननाथ बारगळ, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, एक्झिक्युटिव्ह संचालक सुभाष गवळी,कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,आसवणी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सेक्रेटरी बाबा सय्यद,डेप्यु.सेक्रेटरी संदीप शिरसाठ तसेच सर्व सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक व पदाधिकारी, ऊस उत्पादक सभासद, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्तविक प्रभारी कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डेप्यु. सेक्रेटरी संदीप शिरसाठ यांनी केले तर आभार संचालक सूर्यभान कोळपे यांनी मानले.