गोदाकाठ महोत्सवातून बचत गटाच्या महिलांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक ताकद देण्याचा उद्देश सफल-सौ.चैतालीताई काळे
शालेय विद्यार्थ्यांच्या कला गुणांनी नागरिक झाले मंत्रमुग्ध

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
संधी मिळाली तर महिला देखील संधीचे सोने करू शकतात याचा विश्वास असल्यामुळे बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळवून द्यावी या उद्देशातून मा.आ.अशोकराव काळे व आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गोदाकाठ महोत्सव सुरु करण्यात आला. या गोदाकाठ महोत्सवाला बचत गटाच्या महिलांनी दिलेला प्रतिसाद आणि कोपरगावकरांनी खरेदी करतांना दाखविलेल्या उत्साहातून बचत गटाच्या महिलांबरोबरच छोट्या मोठ्या उद्योगांना आर्थिक ताकद देण्याचा उद्देश सफल झाला असल्याचे जिल्हा बँकेच्या संचालिका सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले.शुक्रवार (दि.१०) पासून सुरु झालेल्या गोदाकाठ महोत्सवाची मोठ्या उत्साहात सोमवार (दि.१३) रोजी सांगता झाली. यावेळी स्टॉल धारक बचत गटाच्या महिलांशी सौ.चैतालीताई काळे यांनी संवाद साधला. बोचऱ्या थंडीचा विचार न करता कोपरगाव शहरासह मतदार संघातील नागरिकांनी प्रतिसाद देतांना गोदाकाठ महोत्सवाला कुटुंबासह भेट देवून चार दिवसात खरेदी करतांना हात आखडता न घेता केलेल्या मनसोक्त खरेदीतून मोठ्या प्रमाणात मालाची विक्री झाल्याचे बचत गटाच्या महिलांनी यावेळी सांगितले.खानदेशातील प्रसिद्ध असलेल्या खापरावरचे पुरणाचे मांडे तयार करण्यासाठी चार पाच महिला राबत असतांना देखील नागरिकांना हे मांडे घेण्यासाठी नंबर लावावे लागत होते. तर तयार मसाले व घरगुती तयार केलेले विविध कडधान्याचे पापड खरेदी करण्यास महिलांनी पसंती दिली. जवळपास सव्वा तीनशेच्या वर स्टॉल्सला भेट दिल्यानंतर ग्रामीण संस्कृतीच्या खाद्य पदार्थाचे दर्शन घडविणाऱ्या विविध खाद्य पदार्थाबरोबर वांग्याचे भरीत आणि त्याला जोडी असललेल्या गरम गरम थाली पीठाने नागरिकांच्या जिभेचे चोचले पुरविले तर प्रचंड गर्दी असल्यामुळे कित्येक नागरिकांनी महाराष्ट्राच्या विविध भागांतील अस्सल गावरान चवीच्या दुर्मिळ खाद्यपदार्थाचा मनसोक्त आस्वाद घेण्यासाठी पार्सल घेवून जाणे पसंद केले.

गोदाकाठ महोत्सवाची महती जिल्हा व राज्यापुरती मर्यादित राहिली नसून हि महती देशभर पसरली असल्यामुळे गोदाकाठ महोत्सवाच्या चार दिवसात बचत गटाच्या महिलांनी कोट्यावधीचा व्यवसाय केला.आज महिला कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेली नाही. स्वतःच्या ज्ञानावर व बुद्धी कौशल्यावर घर संसार सांभाळून महिला स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करीत आहे. महिलांना विशेषत: ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक ताकद देण्याचा गोदाकाठ महोत्सवाचा मुख्य उद्देश असून आ. आशुतोष काळे यांचे याकामी मोठे सहकार्य मिळत असल्याचे सौ.चैतालीताई काळे यांनी सांगितले.कलाकुसरीच्या वस्तू, सजावटीचे साहित्य, मसाला,लोणचे, पापड अशा अनेक गोष्टी विक्रीसाठी महिलांनी आणल्या होत्या. बचत गटाच्या महिलांना तयार मालाची विक्री करण्यासाठी व मतदार संघातील छोट्या मोठ्या व्यवसायिकांना व्यासपीठ मिळाल्यामुळे त्यांच्या देखील व्यवसायाची आर्थिक वृद्धी झाली.त्याचबरोबर विविध शाळेतील नवोदित कलाकारांना आपले कलागुण सादरीकरणासाठी देखील व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे विदयार्थ्यांनी आपले कला, गुण सादर करून महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवत नागरिकांचे मनोरंजन करून त्यांना मंत्रमुग्ध केले.प्रत्येक गावागावात परंपरेनुसार सण उत्सवाच्या वेळी यात्रा-जत्रा भरविल्या जातात त्या माध्यमातून आपल्या परंपरा जपल्या जातात. या परंपराची ओळख बुजली जावू नये. या परंपरा भावी पिढीच्या नेहमी स्मरणात राहण्यासाठी गोदाकाठ महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या प्रयत्नांना नागरिकांसह बचत गटाच्या महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मतदार संघातील नागरिकांबरोबरच शेजारच्या तालुक्यातील नागरीक वर्षभर गोदाकाठ महोत्सवाची वाट पाहत असतात. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणारा व्यवसाय त्यामुळे गोदाकाठ सुरु होण्यापूर्वीच दोन महिने अगोदर सर्व स्टॉल्स बुक झालेले असतात. ग्रामीण भागातील महिला उद्योजकांना प्रोत्साहन देवून त्यांची आर्थिक ताकद वाढविण्याचा, ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविणारा गोदाकाठ महोत्सवाच्या केंद्रबिंदू बनला आहे.