काळानुरुप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा -आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत. भारतासारख्या प्रगत देशात, जिथे एक मोठा लोकसंख्या वर्ग ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये वावरतो, तिथे मोबाईल बँकिंगची सेवा एक महत्त्वपूर्ण युगांतरीत सुधारणा ठरली आहे. त्यामुळे बदलत्या काळानुरुप होणारे बदल आत्मसात करून प्रगतीचा आलेख उंचावत ठेवा असे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी केले आहे. सहकारी बँकिंग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या गौतम सहकारी बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी शनिवार (दि.११) पासून डेबिट कार्ड, युपीआय, क्यु आर व मोबाईल बँकिंग सेवा सुरु केली असून या सेवेचा शुभारंभ बँकेचे मार्गदर्शक आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते कोपरगाव येथील शाखेत करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष सतीश कृष्णानी होते.ते पुढे म्हणाले की, डिजिटल बँकिंगची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून मोबाइल बँकिंग सेवा सुविधाही अधिक सोयीस्कर होऊ लागल्या आहेत. अनेक बँका आणि वित्तीय संस्थांनी त्यांच्या ग्राहकांसाठी मोबाइल बँकिंग सेवा सुरु केल्या असून गौतम बँकेने देखील मोबाइल बँकिंग सेवा सुरु करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. आज प्रत्येक क्षेत्रात क्रांती होत असून नवनवीन बदल होत आहे. बदलत्या काळानुसार स्पर्धेच्या युगात बँकिंग क्षेत्रात देखील हे अमुलाग्र बदल होत असून स्पर्धेत राहण्यासाठी बदल स्वीकारणे अनिवार्य आहे. खातेदार, संस्था पदाधिकारी आणि सभासदांसाठी एका क्लिकवर विविध सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने टाकलेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे सांगत संस्थेचे चेअरमन, व्हा.चेअरमन सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे. या डेबिट कार्ड, युपीआय, क्यु.आर. व मोबाईल बँकिंग सुविधेचा सर्व खातेधारकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी आ.आशुतोष काळे यांनी केले आहे.

प्रास्ताविक करतांना प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमुड म्हणाले की, डिजिटल सेवा सुविधांमुळे गौतम बँक आता राष्ट्रीय बँकेच्या तोडीस तोड सेवा देण्यास तत्पर आहे. केवळ कर्ज देणे व व्याज मिळवणे हाच बँकेचा उद्देश नसून अत्याधुनिक सेवा ग्राहकाला देणे आहे. नागपूर विभागाअंतर्गत २४७ बँकामध्ये गौतम बँकेचा टॉपच्या सहा बँकेत समावेश असून नाशिक जिल्ह्यात आणखी दोन शाखा सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, गौतम सहकारी बँकेचे चेअरमन संजय आगवन, माजी चेअरमन बाबासाहेब कोते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक ज्ञानदेव मांजरे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, सतीशशेठ कृष्णाणी, दत्तोबा गवारे, डॉ.चंद्रशेखर आव्हाड, अॅड.शंतनू धोर्डे, डॉ.शेखर फडके, गौतम बँकेचे प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब बनसोडे यांनी केले तर आभार श्रीकांत तिरसे यांनी मानले.