गौतम बँकेला दुहेरी राष्ट्रीय मान, गुंतवणूक व डिजिटल सेवेत अव्वल

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे आधारस्तंभ मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम सहकारी बँकेने नेत्रदीपक कामगिरी करून आजवर अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळविले आहेत.परंतु यापुढे जावून गौतम बँकेने राष्ट्रीय स्तरावरील पुरस्काराला गवसणी घातली आहे ती देखील एकाच वेळी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळविण्याची अतुलनीय कामगिरी गौतम बँकेने करून दाखविली आहे. देश पातळीवरील प्रतिष्ठित असलेल्या ‘बँकिंग फ्राँटियर’ या संस्थेकडून गौतम बँकेला एकाच वेळी दोन नामांकित पुरस्कार दक्षिण गोवा येथे हॉटेल ‘हॉलिडे इन’ येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात, गोवा राज्याचे सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्री ना.सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे.
गौतम सहकारी बँकेच्या इतिहासातील हा सन्मानाचा क्षण असून बँकेने आपल्या पारदर्शक धोरणांमुळे, प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आणि सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक यांच्या अतूट विश्वासामुळे हा मान मिळवला आहे. स्पर्धेच्या युगात आपल्याला जगासोबत चालावेच लागणार असून त्याला सहकारी बँकिंग क्षेत्र देखील अपवाद नाही. आपल्या गौतम बँकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पारदर्शक कार्यपद्धती आणि ग्राहकसेवेतील प्रामाणिकपणा जपला आहे. गौतम सहकारी बँक ही केवळ व्यवहारांची संस्था नसून, विश्वास, प्रगती आणि आधुनिकतेचं प्रतीक आहे. हाच विश्वास सार्थ ठरवत बँकेने राष्ट्रीय पातळीवर भव्य कामगिरी करून ‘बँकिंग फ्राँटियर’ या देशपातळीवरील नामांकित संस्थेकडून एकाचवेळी दोन मानाची पारितोषिके आपल्या शिरपेचात खोचली आहेत. –आ.आशुतोष काळे
तसेच पारदर्शक व्यवहार,उत्कृष्ट व्यवस्थापन, ग्राहकांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या गौतम बँकेने सहकारी बँकिग क्षेत्रात आपली वेगळी प्रतिमा निर्माण करून आपल्या कार्यक्षमते बाबत व प्रशासकीय कारभाराबद्दल अनेक पुरस्कार मिळविले आहेत. यामध्ये अजून दोन पुरस्कारांची भर पडली आहे आणि ती देखील राष्ट्रीय पातळीवरच्या पुरस्काराची. हे पुरस्कार बँकेला उत्कृष्ट गुंतवणूक धोरण राबवल्याबद्दल तसेच उत्कृष्ट ऑनलाईन पेमेंट पद्धती विकसित केल्याबद्दल मिळाली असून त्यामुळे बँकेच्या कार्यपद्धतीवर एकप्रकारे राष्ट्रीय दर्जाची मोहोर उमटली आहे. फिनिक्स पक्षाप्रमाणे यशाच्या उत्तुंग शिखराकडे वेगाने वाटचाल करीत असलेल्या गौतम बँकेसाठी हा खरोखर अभिमानाचा क्षण आहे. त्याबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी बँकेचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, प्रशासकीय अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे आभिनंदन केले आहे.

हे दोन्ही पुरस्कार गोवा येथे हॉटेल ‘हॉलिडे इन’ येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात, गोव्याचे सहकार खात्याचे कॅबिनेट मंत्री ना.सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते बँकेचे चेअरमन संजय आगवण, व्हा.चेअरमन सुनील डोंगरे, ज्येष्ठ संचालक राजेंद्र ढोमसे, प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे, संगणक विभाग प्रमुख उमेश ढगे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. याबद्दल प्रतिक्रिया देतांना प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड यांनी सांगितले की, कर्मवीर शंकररावजी काळे यांनी सहकारी साखर कारखान्याबरोबरच गौतम सहकारी बँकेची स्थापना करून सहकार हा केवळ व्यवहार नव्हे तर समाजसेवेचा शुद्ध मंत्र आहे ही शिकवण दिली. त्यांचा सहकार क्षेत्रावरील दूरदृष्टीकोन, उद्योगशील वृत्ती आणि नवनिर्मितीची तळमळ माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी जपली असून त्यामुळेच गौतम बँकेला भक्कम पाया व सक्षम दिशा मिळत आहे.

गौतम सहकारी बँकेच्या सर्वांगीण प्रगतीमागे त्यांचे मोलाचे मार्गदर्शन व योगदान आहे. त्यांची आधुनिकतेला प्रोत्साहन देणारी भूमिका आणि सहकार क्षेत्रावरील असलेले प्रेम यामुळेच बँकेला सातत्याने नवनवीन शिखरे पादाक्रांत करता आली. त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी दिशादर्शक ‘दीपस्तंभ’ असून या यशाचे आणि पुरस्काराचे खरे शिल्पकार तेच आहेत.