टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थायांचा रिंगण व दिंडी सोहळा

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आषाढी एकादशी निमित्त कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलमध्ये टाळ-मृदंगाच्या साथीने विद्यार्थ्यांचा दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. वारकऱ्यांची वेशभूषा, मुखी हरिनामाचा जागर करीत शाळेतील विद्यार्थी वारीच्या आनंद सोहळ्यात मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या हस्ते पंढरीच्या विठुरायाची व रुक्मिणी मातेच्या पालखीचे पूजन करण्यात आले.महाराष्ट्राच्या मराठमोळ्या परंपरांचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत जाणीवपूर्वक घेवून जाण्यासाठी संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या संकल्पनेतून शालेय व्यवस्थापन तसेच शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत विविध सण उत्सव मोठ्या उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरे केले जातात. त्याप्रमाणे आषाढी एकादशीचा सोहळा देखील साजरा करण्यात आला.आषाढी एकादशीनिमित्त गौतम पब्लिक स्कूल ते शहाजापुर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरापर्यंत भव्य पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी या सोहळ्याचे खास आकर्षण ठरला विश्वास नावाचा अश्व. या अश्वाने यावेळी केलेले नृत्य व मारलेली प्रदक्षिणा, विठ्ठल-रखुमाई व वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशभूषेतील शेकडो विद्यार्थ्यांच्या विठू नामाच्या जय घोषाने परिसर दणाणून गेला होता. यावेळी ह.भ.प. लोणारे महाराज यांनी विद्यार्थ्यांना आध्यात्मिक उपदेश केला. शहाजापूर ग्रामस्थांनी विद्यार्थी व शिक्षक यांच्या फलाहाराची व्यवस्था करून उपस्थित शिक्षकांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे, संस्था विश्वस्त आ.आशुतोष काळे, सचिव सौ चैतालीताई काळे, संस्था विश्वस्त, प्राचार्य नूर शेख यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.आषाढी एकादशीच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे प्राचार्य नूर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागातील सुधाकर निलक, रमेश पटारे, राजेंद्र आढाव, इसाक सय्यद सांस्कृतिक विभागातील सौ.रेखा जाधव, गोरक्षनाथ चव्हाण व सर्व हाऊस मास्टर्स आदींनी विशेष परिश्रम घेतले.