प्रधानमंत्री आवास योजनेच्या नाव नोंदनीला मुदतवाढ लाभ घेवू न शकलेल्या नागरिकांनी लाभ घ्यावा – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
देशातील प्रत्येक व्यक्तीला पक्के घर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून सुरु करण्यात आलेल्या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम मुदत दि.१५ मे होती. परंतु गरजू नागरीक या पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी दि.३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.तसेच प्रधानमंत्री आवास योजना ही भारत सरकारची एक प्रमुख मोहीम असून या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांचे हक्काच्या पक्क्या घराचे स्वप्न सत्यात उतरावे यासाठी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजू पात्र नागरीकांना स्वत:च्या स्मार्ट फोनवरून सहजपणे आपली नाव नोंदणी करणे शक्य होते. परंतु कित्येक अशिक्षित नागरीकांना स्मार्ट फोनचा वापर योग्य पद्धतीने करता येत नसल्यामुळे असंख्य गरजू आदिवासी व गोर गरीब नागरिकांना या योजनेचा फायदा घेता आला नाही. तसेच ज्या वेबसाईटवर नाव नोंदणी करणे आवश्यक होते ती वेबसाईट देखील बंद राहत असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी अधिकच वाढल्या जावून असंख्य गरजू नागरीक या योजनेपासून वंचित राहणार होते. त्याबाबत राज्य शासनाकडे या पंतप्रधान आवास योजनेच्या नाव नोंदणीसाठी मुदतवाढ देणेबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजीतदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पंतप्रधान आवास योजनेची मुदतवाढ करण्याबाबत केलेल्या विनंतीवरून केंद्र शासनाने पंतप्रधान आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली नाव नोंदणी करण्यासाठी दि.३१ मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मिळालेल्या मुदतवाढीचा फायदा घेवून ज्या गरजू नागरिकांना या योजनेत अद्यापपर्यंत आपली नावे नोंदविता आली नाही अशा नागरिकांनी मुदतीच्या आत आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. ज्या नागरिकांना आपले नाव नोंदणी करण्यात अडचणी येत असेल अशा नागरीकांना ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य सहकार्य करावे अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी केल्या आहेत.