आ.आशुतोष काळेंच्या डावा कालवा दुरुस्तीच्या मागणीला जलसंपदा मंत्री ना. विखे पाटलांचा सकारात्मक प्रतिसाद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
गोदावरी उजव्या कालव्यावरील माती काम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याचे काम जल संपदा विभागाने हाती घेतले हि गोदावरी उजव्या कालव्याच्या लाभधारक क्षेत्राच्या शेती व शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय समाधानकारक व दिलासा देणारी बाब आहे. परंतु उजवा कालवा पण आपला आहे आणि डावा कालवा देखील आपलाच आहे. त्यामुळे उजव्या कालव्याबरोबर डाव्या कालव्याचे व चाऱ्यांचे काम देखील पूर्ण करावे अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी केली असता त्या मागणीला जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम टप्पा १ अंतर्गत १९१.५८ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या गोदावरी उजवा तट कालव्यावरील माती काम, बांधकाम व अस्तरीकरण करणे कामाचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार (दि.०२) रोजी अस्तगाव (ता.राहाता) येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर.पाटील यांच्या शुभहस्ते व जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते. तत्पूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री ना.सी.आर. पाटील यांचे काकडी येथील श्री साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले असता आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदारसंघाच्या वतीने त्यांचे स्वागत केले. यावेळी पुढे बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की, गोदावरी कालव्यांचे आयुर्मान १०० वर्षापेक्षा जास्त झालेले असून दरवर्षी लोकसंख्या वाढत आहे.

धरणातील पाण्यावर पिण्याचे व औद्योगिकरणाचे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे पर्यायाने शेतीसाठी पाणी दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. कमी झालेल्या पाण्याची तुट भरून काढण्यासाठी पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी पूर्वेला अती तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळविणे अत्यंत गरजेचे आहे. हे पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचे काम जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हातून पूर्ण व्हावे व ते निश्चितपणे पूर्ण करतील आणि गोदावरी खोऱ्याची पाण्याची तुट भरून काढतील असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केला.यावेळी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पा., मा. खा. सुजय विखे पा., जलसंपदा विभागाचे मुख्य सचिव दिपक कपूर, लाभक्षेत्र विकास सचिव मा.डॉ. संजय बेलसरे, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार, जलसंपदा उत्तर विभागाचे मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, कार्यकारी अभियंता श्रीम. सोनल शहाणे, उपविभागीय अभियंता तुषार खैरनार,गौतम बँकेचे मा. चेअरमन बाबासाहेब कोते, श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अभय शेळके, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलासबापू कोते आदींसह महायुतीचे कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.