योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मतदार संघाच्या विकास कामांसाठी अथक पाठपुरावा करून निधी आणावा लागतो. योजनेसाठी आलेला निधी योग्य पद्धतीने व योग्य वेळेत खर्च झाला तरच शेतकऱ्यांचा व जनतेचा फायदा होईल. त्यामुळे या निधीचा सदुपयोग होणे गरजेचे आहे. त्यासाठी विकास कामांचा निधी योग्य प्रकारे सत्कारणी लावून नागरीकांना सुविधा द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडीअडचणी लवकरात लवकर मार्गी लावून हे प्रश्न सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार सुरु केल्यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळत आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक होत असल्यामुळे प्रत्येक जनता दरबारात टप्प्याटप्प्याने शासकीय कार्यालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांचा एकाच वेळी संपर्क करून प्रश्न सोडविले जात आहे. सोमवार (दि.२८) रोजी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेवून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मृद व जल संधारण, जल नि:सारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग आदी विभागाचा जनता दरबार घेतला यावेळी ते बोलत होते.यावेळी नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आ.आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघात रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे ज्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन फुटल्या आहेत त्या पाईप लाईनची दुरुस्ती करा. तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे देखील पूर्ण करा. जलजीवन मिशन अंतर्गत मतदार संघातील सर्वच गावामधील पाणी पुरवठा योजना मंजूर आहेत. परंतु काही योजना पूर्ण होत असताना गावातील नागरिकांना अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्यामुळे गावच्या अडचणी लक्षात घेऊन योजनाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा. उक्कडगाव, शिरसगाव, सावळगाव, तिळवणी, आपेगाव तसेच मोर्वीस या गावांना सद्य स्थितीत पाणी उपलब्ध नसल्यामुळे या गावांतील नागरिकांसाठी पाण्याची व्यवस्था करा.

या सर्व गोष्टींचा विचार करून सध्या असलेले पाणी आरक्षण बदलावे लागेल तसेच काही नविन योजना सुरु करण्याचा विचार करावा लागणार आहे. या योजना मंजूर करणेकरीता शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे करण्याची संधी आहे. जलयुक्त शिवाराचे देखील कामे मंजूर असून काही कामे प्रलंबित असून ज्या ठेकेदारांनी ती कामे घेतली आहेत त्यांनी ती लवकरात लवकर पूर्ण करावीत. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून खिर्डी गणेश, बोलकी आदी गावामध्ये चांगल्या प्रकारची कामे झालेली असून यामुळे त्या भागात भूगर्भातील पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे.जलसंधारण योजने अंतर्गत आपल्या मतदार संघातील अनेक कामे मंजूर आहेत. जलसंधारण विभागाच्या माध्यमातून विकास कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर केलेले आहे. या सर्व कामांना मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणार आहे. तो निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पावसाळा सुरु होण्या अगोदर सद्य स्थितीत सुरु तसेच प्रलंबित असलेली कामे ठेकेदार, अधिकारी यांनी तातडीने पूर्ण करावेत अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.आ.आशुतोष काळे यांनी सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकारी एकाच वेळी न बोलविता टप्या टप्याने विविध विभागाचे अधिकारी जनता दरबारात बोलविले जावून नागरिकांच्या समस्या सोडविल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. यावेळी गटविकास अधिकारी संदीप दळवी, नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे, यांचे समवेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मृद व जल संधारण, जल नि:सारण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे संबधित अधिकारी, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे पदादिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.