कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताच्या संविधानाचे शिल्पकारच नव्हते, तर त्यांच्या विचारांचा पाया हा समानता, बंधुता, व स्वातंत्र्य या तत्वावर आधारित होता ते महान विचारवंत होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आज आपल्याला लोकशाही, स्वतंत्र विचार आणि मूलभूत हक्कांची जाणीव आहे. आजच्या तरुण पिढीने त्यांचे विचार आत्मसात करून समतेचं आणि सामाजिक बंधुत्वाचं स्वप्न साकार करावं, हीच त्यांना खरी आदरांजली ठरणार आहे असे प्रतिपादन माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी केले.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकरावजी काळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ दलित समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी समता, बंधुता आणि न्यायाचे तत्वज्ञान दिले. भारताच्या राज्यघटनेचे मुख्य शिल्पकार म्हणून त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा व त्यांनी शिक्षणाच्या जोरावर माणूस स्वत:ची ओळख तयार करू शकतो व अन्याया विरुद्ध लढू शकतो त्यांचे हे बहुमुल्य विचार आजही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनिलजी कोल्हे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, डेप्यु. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, चीफ इंजिनिअर निवृत्ती गांगुर्डे, चिफ केमिस्ट सुर्यकांत ताकवणे, शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे, तसेच सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांनी देखील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.