चिमुकल्या स्नेहलच्या कुटुंबाला तातडीने मदत मिळवून द्या आ.आशुतोष काळेंच्या वनविभागाला सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथील बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होवून मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्या स्नेहल राशिनकरच्या कुटुंबाला वन खात्याकडून तातडीने मदत मिळवून द्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी वनविभागाला दिल्या आहेत.मागील आठवड्यात बुधवार (दि.२६) रोजी कोपरगाव मतदार संघातील धनगरवाडी येथे दिघी रस्त्यावर वास्तव्यास असलेल्या राशिनकर कुटुंबातील संतोष राशिनकर यांची मुलगी स्नेहल वय वर्ष (०७) हीला रात्री नऊ वा.च्या दरम्यान बिबट्याने घरासमोरून उचलुन नेवून जवळपास शंभर फूट फरफटत नेले. त्यावेळी परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने मुलीला गंभीर जखमी अवस्थेत अंधारात सोडून जवळील शेतात धूम ठोकली.जखमी स्नेहलला तातडीने लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी घेवून गेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्नेहल मृत झाल्याचे सांगितले. राशिनकर कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.३१) रोजी धनगरवाडी येथे जावून राशिनकर कुटुंबाची भेट घेवून त्यांचे सांत्वन केले. झालेली घटना अतिशय दु:खद असल्याचे सांगत चिमुकल्या स्नेहलच्या दुर्दैवी मृत्यूमुळे निर्माण झालेली दु:खाची पोकळी कधीही भरून निघणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित असलेल्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना झालेल्या घटनेच्या पंचनाम्याचे कागदपत्रे व आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची लवकरात लवकर पूर्तता करून मयत चिमुकल्या स्नेहल राशिनकरच्या कुटुंबाला तातडीने सरकारकडून देण्यात येणारी मदत मिळवून दया. कोणत्याही अडचणी आल्यास माझ्याशी किंवा जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधा.आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे लावून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या.यावेळी गौतम बँकेचे माजीं चेअरमन बाबासाहेब कोते, आण्णासाहेब कोते, सरपंच गोपीनाथ खरात,उपसरपंच साहेबराव आदमाने, माजी उपसरपंच अनिल रक्टे, अंजाबापू रक्टे, अंबादास रक्टे, अशोक रक्टे,गणेश राशिनकर, संतोष राशिनकर व राशिनकर कुटुंबीय, तसेच वनक्षेत्र अधिकारी युवराज पाचारणे, वनपाल विठ्ठल सानप व धनगरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.