नागरीकांना वेठीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरु करा आ.आशुतोष काळेंच्या तहसीलदारांना सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महसूल विभागाने सुरु केलेल्या काम बंद आंदोलनामुळे नागरीकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरु असलेली मुजोरी चालणार नाही नागरीकांना वेठीस न धरता महसूल विभागाचे काम त्वरित सुरु करा अशा सुचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत.कोपरगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर करण्यात आलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कोपरगाव तालुका तलाठी संघटनेने मागील आठ दिवसापासून काम बंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नागरीकांना होत असेलल्या त्रासाची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना यावर तातडीने तोडगा काढून काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांचे महसूल विभागाशी सबंधित कामे अडली आहेत. १० वी १२ वीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी विविध शासकीय दाखल्यांची आवश्यकता असते. प्रवेशाच्या वेळी वेळेत दाखले उपलब्ध होत नसल्यामुळे १० वी १२ वीचे विद्यार्थी परीक्षा आटोपताच विविध शासकीय दाखले काढून ठेवतात त्यामुळे पुढच्या अडचणी कमी होवून विद्यार्थी व पालकांची धावपळ होत नाही. परंतु तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे विद्यार्थ्यांना शासकीय दाखले मिळविण्यात अडचणी येत आहेत. तसेच नागरीकांना विविध कामांसाठी उत्पनाचे दाखले तसेच शेतीवर घेतलेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी शेतीचे चालू वर्षाचे उतारे आवश्यक असतात. सर्वच बँकांची वर्षअखेरीचा ताळेबंद जुळविण्याची प्रक्रिया वेगात सुरु असून कर्जधारक शेतकऱ्यांकडे कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी बँकांचा तगादा सुरु आहे परंतु तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांना शेतीचे सात बारा उतारे मिळत नाही अशा अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे.

त्या पार्श्वभूमीवर नागरीकांना महसूल विभागाच्या काम बंद आंदोलनामुळे येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची सुरु असलेली मुजोरी यापुढे खपवून घेणार नाही. त्याबाबत तुम्ही केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करून त्यांच्याकडून मार्गदर्शक सूचना घ्या व त्या सूचनेनुसार काम करा.सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही याची काळजी घेवून महसूल विभागाचे काम त्वरित सुरु करा अशा सुचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना दिल्या आहेत.