मोठी स्वप्ने बघा आणि ती साकार करा-उपजिल्हाधिकारी सायली सोळंके

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
विद्यार्थ्यांनी नेहमीच मोठी स्वप्ने बघावीत आणि ती साकार करण्यासाठी जिवाचे रान करावे, असे आवाहन अहिल्यानगरच्या उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी केले.कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी-सुरेगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित कै.सौ.सुशिलाताई ऊर्फ माईसाहेब काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित वक्तृत्व स्पर्धेच्या बक्षीस व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे या होत्या.यावेळी त्या म्हणाल्या की, जीवनात यशस्वी होण्यासाठी सातत्याने वाचन केले पाहिजे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात प्रत्येक पायरीवर पुस्तकांची गरज भासते. पुस्तके आपल्याला खूप गोष्टी शिकवतात तसेच आपल्या आयुष्यात नेहमी एक गुरु असायलाच हवा परंतु, प्रत्येक वेळेस गुरु भेटेलच असे नाही तेव्हा पुस्तक हाच विद्यार्थ्याचा गुरु व्हायला हवा असे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी केले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे त्या म्हणाल्या की, प्रत्येकाकडे वेग-वेगळे गुण असतात ते आपण ओळखले पाहिजेत आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाला आकार दिला पाहिजे. तसेच आपल्या मनातील कुठलीही भीती काढण्यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त सरावाचीच आवश्यकता असते. तुम्ही करत असलेला अभ्यास भविष्यात नक्कीच तुम्हाला उपयोगी पडणार आहे. सध्याच्या काळात आपण सर्वच विचार करण्याची क्षमता हरवुन बसलो आहोत. त्याचे मुख्य कारण म्हणजे सोशल मिडिया. आपला बहुतांश वेळ मोबाईलच्या अती वापरात वाया घालवत आहोत. विद्यार्थ्यानी आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी मोबाईलचा अती वापर न करता अभ्यास करणे गरजेचे असल्याचे उपजिल्हाधिकारी सायली सोळंके यांनी सांगितले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ.चैताली काळे म्हणाल्या की, प्रत्येकाने आपली आवड आयुष्यभर जोपासली पाहिजे. तसेच थोडा वेळ आपल्या आवडीसाठी देखील दिला पाहिजे. सध्याच्या काळात सतत सोशल मिडियाच्या अतिरिक्त वापरामुळे आजच्या पिढीचे ध्येयावरून लक्ष दूर जात असल्याचे दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यानी सोशल मिडियाकडे आकर्षित न होता त्याचा वापर हा मर्यादित आणि आवश्यकतेनुसारच करावा. आयुष्यात आपण चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे. जर आपल्याला आपल्या आई-वडिलांचे नाव मोठे करायचे असेल तर आपण कोण आहात याचे चिंतन करूनच खर्या अर्थाने आयुष्यात पुढे जाता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विंचूर तसेच राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर कोळपेवाडी ही विद्यालये मानाच्या फिरत्या करंडकाचे मानकरी ठरले.याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अरुण चंद्रे, संभाजीराव काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरु कोळपे, उपाध्यक्ष बाळासाहेब ढोमसे, डॉ.आय.के.सय्यद, माता-पालक समितीच्या अध्यक्षा श्रीमती वहाडणे, छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश चौरे, राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या प्राचार्या हेमलता गुंजाळ, श्री.छत्रपती संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे, सुकदेव काळे, शेख सर, रमेश मोरे, पोपटराव येवले, सतीश नरोडे, भाऊसाहेब लुटे, बाबासाहेब आभाळे, उपमुख्याध्यापक मधुकर गोडे, पर्यवेक्षक सुरेश खंडिझोड, सचिव सिद्धार्थ कांबळे, सहसचिव नितीन बारगळ, निलेश डोंगरे आदी मान्यवरांसह शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन बारगळ यांनी केले. स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले व आभार सिद्धार्थ कांबळे यांनी मानले.