गुलाबी साडी फेम संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याच्या ठेक्यावर हजारो महिलांनी धरला ताल, दांडिया स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ. आशुतोष काळे यांच्या वतीने नवरात्रौत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर स्त्री शक्तीचा’ नवरात्र उत्सव कार्यक्रमा अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या भव्य दांडिया स्पर्धेला महिलांचा उस्त्फुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी दांडिया स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेला गुलाबी साडी फेम संजू राठोड यांच्या गुलाबी साडी– या गाण्यावर उपस्थित हजारो महिलांनी चांगलाच ठेका धरला होता.प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ व आ.आशुतोष काळे यांच्या वतीने यावर्षी नवरात्र महोत्सव भव्य दिव्य पद्धतीने साजरा करतांना भव्य दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून हि स्पर्धा रविवार (दि.०६) व सोमवार (दि.०७) रोजी दोन दिवस घेण्यात आली. या स्पर्धेसाठी रविवार (दि.०६) रोजी गुलाबी साडी फेम संजू राठोडला निमंत्रित करण्यात आले होते.
आ.आशुतोष काळे जिगरबाज नेतृत्व
कोपरगाव मतदार संघाच्या विकासासाठी तीन हजार कोटी निधी आणणे सोपी गोष्ट नाही. त्यासाठी जिगर लागते आणि हे काम फक्त जिगरबाज व्यक्तीच करू शकतात. अशी अद्भुत कामगिरी करून दाखविणारे आ. आशुतोष काळे जिगरबाज नेतृत्व आहे-संजू राठोड
यावेळी लहान गट व खुल्या गटातील दांडिया स्पर्धकांनी अतिशय तालबद्ध पद्धतीने दांडिया खेळाचे प्रदर्शन करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. तर या दांडिया स्पर्धेचा मुख्य आकर्षण असलेला संजू राठोड ने ‘गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ’ व ‘नऊवारी साडी’या गाण्यावर आपल्या जादुई आवाजाने उपस्थित हजारो महिलांना ताल धरायला लावला.
सिनेसृष्टीत आपल्या जिद्दीच्या जोरावर स्थान निर्माण करणारा गायक संजू राठोडने नवनवीन गाण्यांमुळे अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला असून त्याच्या कित्येक गाण्यांनी सर्व प्रेक्षकांना अक्षरश:भुरळ घातली आहे. त्याच संजू राठोडला पाहण्यासाठी व ‘गुलाबी साडी’ हे गाणं ऐकण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महिलांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.यावेळी आ.आशुतोष काळे व सौ.चैतालीताई काळे यांनी देखील गुलाबी साडीच्या गाण्यावर ताल धरत दांडिया स्पर्धक व उपस्थित महिलांचा उत्साह वाढविला.