चांदेकसारे घारी रस्त्याचे व पुलाचे दुर्दैव कधी संपणार ?नागरिक संतप्त – आबासाहेब पवार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
चांदेकसारे व कुंभारी या दोन गावाच्या दरम्यान पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत तयार झालेला रस्ता अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे तसेच अरुंद झाल्यामुळे त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. या भागातील दळणवळणासाठी मोठी कसरत सुरू आहे. कोट्यवधीच्या वल्गना आणि फलकबाजी होऊन देखील काम अद्याप झाले नाही. नक्की निधी कुठे गेला ? काम का नाही झाले यावर कुणीही बोलण्यास तयार नाही त्यामुळे निधी हरवला आहे का अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे अशी अशी प्रतीक्रिया घारी येथील प्रगतशील शेतकरी आबासाहेब पवार यांनी दिली आहे.दरम्यान ह्या रस्त्याची ठेकेदाराच्या अखत्यारीतील देखभाल दुरुस्ती काळातही या रस्त्याची कधी दुरुस्ती झाली नाही.अथवा देखरेख करणारी यंत्रणा देखील कधीही दिसली नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर वेड्या बाभळीची झाडे वाढलेली आहेत. दोन गावांच्या दरम्यान रस्त्यावर जे पूल बांधलेले आहेत त्यांचेही कठडे तुटलेले आहेत, पुलाची दुरावस्था झालेली आहेत त्यामुळे अपघात घडत आहेत. तसेच अनेक ठिकाणी रस्ता अनधिकृतरित्या खोदल्यामुळे खड्डे तयार झालेले आहेत या गोष्टी निदर्शनास आणून त्याकडेही संबंधित यंत्रणेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे अशी चर्चा आहे.घारी येथील नदीवरील असणारा पूल अनेकदा पुराच्या पाण्याखाली जाऊन कमकुवत झाला आहे.बाजूचे लोखंडी सुरक्षा कठडे तुटून पडलेले आहेत,त्यामुळे या पुलाची उंची वाढवून त्याची दुरुस्ती होण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती. त्यावर निवडणुकीच्या आधी १ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याच्या फलकबाज्या झाल्या मात्र प्रत्यक्ष काम सुरू होईल हे दिवास्वप्नच ठरले आहे.आगामी पावसाळा काही महिन्यावर आहे त्यात रस्त्यांची कामे होणार नाही त्यामुळे आता येत्या तीन चार महिन्यात ही कामे झाली नाही तर जनतेला धोकादायक प्रवासच नशिबी असणार आहे का अशी भावना झाली आहे.

रस्ते हे ग्रामीण विकासाच्या धमन्या आहेत. भारत देश कृषीप्रधान असल्याने देशातील बहुतांश जनता ही ग्रामीण भागात राहते. ग्रामीण भागातील लोकसंख्येचे प्रमाण शहरी भागांच्या तुलनेत अधिक आहे. शहरी भागात विविध उद्योग व्यवसायांची प्रगती होत असली तरी त्याचे द्योतक गावातच आहे. उद्योग, व्यवसाय वा व्यापार हा शहरी भागात सुरू असला तरी त्यासाठी आवश्यक असलेला कच्चा माल अर्थात शेतमालाची निर्मिती ग्रामीण भागातच होत असल्याने शहर ते ग्रामीण भागापर्यंत पोहोचण्यासाठी, शेतमालाची वाहतूक करण्यासाठी ग्रामीण भागातील रस्ते चांगले असणे आवश्यक आहे.असे असले तरी शासन कोट्यावधी रुपये खर्च करून रस्त्याची निर्मिती करत असताना त्याचा दर्जा सांभाळणं त्यानंतर त्याची देखभाल व दुरुस्ती हे खरंतर शासकीय यंत्रणेचे काम आहे. याविषयी मात्र खूपच उदासीनता दिसून येते आहे अशीच दुरावस्था या रस्त्याची झाली आहे.रस्ता खड्डेमय झाल्यामुळे त्याचा परिणाम शेतकरी, दुग्ध व्यावसायीक, नोकरदार वर्ग, शालेय विद्यार्थी, शेतकरी मजूर महिला, दुग्धव्यवसाय करणारे, आरोग्य सेवा यासह विविध वर्गातील लोकांना यांचा मोठा शारीरिक आर्थिक मनस्ताप सहन करावा लागतो आहे असेही शेवटी पवार म्हणाले आहेत.