तर मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल आ.आशुतोष काळेंनी पुकारला अवैध वाळू तस्करी विरोधात एल्गार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
अवैध वाळू तस्करीबाबत असंख्य नागरिकांच्या तक्रारी आहेत. नियम धाब्यावर बसवून प्रचंड प्रमाणात वाळू तस्करी होत आहे. याबाबत अनेकवेळा महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या परंतु त्यांच्याकडून सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे आपला संयम आता संपला आहे. वेळप्रसंगी कायदा हातात घेवून मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल असा ईशारा देत आ.आशुतोष काळे यांनी अवैध वाळू तस्करीविरोधात एल्गार पुकारला आहे.कोपरगाव तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू व्यवसायाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर आ. आशुतोष काळे यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, शासकीय वाळू लिलावातून शासनाला महसूल मिळतो हे मान्य आहे. परंतु हा वाळू उपसा करीत असतांना त्यासाठी महसूल व पर्यावरण विभागाने काही नियम घालून दिलेले आहेत.मात्र हे नियम धाब्यावर बसवून प्रचंड वाळू उपसा केला जात असून शासकीय वाळू लिलावाबरोबरच अवैध वाळू व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वाळूच्या अवजड वाहनांमुळे रस्त्याची तर वाट लागलीच आहे. परंतु स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या सहकार्यातून व माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अथक प्रयत्नातून उभ्या राहीलेल्या ज्या धारणगाव-कुंभारी पुलाने कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यास मदत केली त्या पुलाच्या पायाजवळून दिवसा ढवळ्या सुरु असलेला वाळू उपसा महसूल आणि पोलीस प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत आहे हि चीड आणणारी बाब आहे.

जर या पुलाच्या पायाजवळ सुरु असलेल्या वाळू उपश्यामुळे पुलाला काही धोका झाला तर काय परिणाम होवू शकतात याचे किंचितही गांभीर्य महसूल आणि पोलीस प्रशासनाला नाही.त्याबाबत अनेकवेळा महसूल आणि पोलीस प्रशासनाला सूचना केल्या परंतु त्यांच्याकडून हा वाळू उपसा थांबविला गेला नाही. त्यामुळे मी स्वत: याबाबत पुढाकार घेत असल्याचे सांगत मला कायदा हातात घ्यावा लागेल असे संकेत देत मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल असा गर्भित ईशारा त्यांनी दिला आहे.कोपरगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात गोदावरी नदीचे विस्तीर्ण पात्र लाभले असून या पात्रात मोठ्या प्रमाणात वाळू साठा असल्यामुळे महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कोपरगाव तालुक्यासह बाहेरील तालुक्यातून वाळू तस्करांनी कोपरगाव तालुक्यात आपले बस्तान बसविले आहे. या वाळू तस्करांची मुजोरी एवढी वाढली आहे की, प्रशासनाचा वरदहस्त पाठीशी असल्यामुळे हे वाळू तस्कर कुणालाही जुमानत नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक देखील या वाळू तस्करांच्या दहशतीखाली असल्यामुळे गोदावरी नदीतील कित्येक शेतकऱ्यांच्या पाईप लाईनचे नुकसान होवून देखील शेतकरी हा त्रास मुकाट्याने सहन करीत आहेत. परंतु या अवैध वाळू तस्करी विरोधात आ. आशुतोष काळे यांनीच आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे मतदार संघातील नागरिकांनी त्यांच्या या आक्रमक भूमिकेचे स्वागत केले आहे.