ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसते आ.आशुतोष काळेंची कोल्हेंवर नाव न घेता खोचक टीका

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मराठी भाषेत एक म्हण आहे, ज्यांना कावीळ झाली आहे त्यांना सगळंच पिवळं दिसते अशीच काहीशी परिस्थिती ज्यांना विकास दिसत नाही त्या विरोधकांची झाली आहे अशी खोचक टीका आ.आशुतोष काळे यांनी पारंपारिक विरोधक कोल्हे यांचे नाव न घेता केली आहे. कोपरगाव तहसील कार्यालयात संजय गांधी योजना व श्रावण बाळ योजनेचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित केली होती यावेळी पत्रकारांशी संवाद साधतांना आ.काळे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, कुठेतरी काहीतरी चुकीचे आरोप करून नागरीकांची दिशाभूल करायची असा प्रकार विरोधकांकडून सुरु आहे, मात्र जनता समजदार आहे. मा.आ.अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात बांधलेल्या तहसील कार्यालयाच्या फर्निचरसाठी त्यांना त्यांच्या कार्यकाळात निधी आणता आला नाही. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना या तहसील कार्यालयात बसण्यासाठी व्यवस्था त्यांना करता आली नाही. त्यासाठी मी स्वत: आमदार नसतांना नागरिकांना बसण्यासाठी तहसील कार्यालयाला बाकडे दिले व २०१९ ला निवडून आल्यानंतर फर्निचरसाठी जवळपास १.९३ कोटी निधी मी दिला आहे त्यामुळे त्यांनी विकासावर बोलू नये.त्यांनी पाच वर्षांमध्ये त्यांच्या कार्य काळात चांगले काम केले असते तर त्यांना अशा गोष्टींमध्ये पडायची गरज पडली नसती. मतदार संघाचा झालेला विकास मतदार संघातील जनतेला दिसत आहे. कोपरगाव शहरातील ५ नं.साठवण तलाव, उपजिल्हा रुग्णालय, रस्ते, ग्रामीण भागातील रस्ते, पूल, अशा विविध विकास कामांना तीन हजार कोटीचा निधी आणला आहे. या निधीतून कित्येक काम पूर्ण झाली आहेत तर काही प्रगतीपथावर आहे. हा विकास जनतेला दिसतो मात्र ज्याप्रमाणे ज्यांना कावीळ झाली त्यांना सगळच पिवळ दिसते त्याप्रमाणे ज्यांना विकास करता आला नाही त्यांना विकास देखील दिसत नाही. मतदार संघात जे काही रस्ते खराब झाले आहेत त्या विभागाला दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी काही दुसरी व्यवस्था करण्यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत.पण ज्यांना विकासच दिसत नाही ते फक्त आरोपच करीत असून असे आरोप करण्यापेक्षा जनतेवर विश्वास ठेवा. त्यांना लवकर विकासाची दृष्टी यावी व मतदार संघाचा विकास दिसावा यासाठी नागरिकांनी प्रार्थना करावी अशी टीका आ.आशुतोष काळे यांनी यावेळी कोल्हे यांचे नाव न घेता केली.यावेळी यांनी संजय गांधी योजनेत एकूण ३९३ प्रकरणापैकी १९५ प्रकरणे मंजूर करण्यात आली उर्वरित अर्जदारांच्या कागदपत्रांची पूर्तता करून तातडीने पुढील प्रकरणे मंजूर करण्यासाठी प्रशासनाने लवकरात कार्यवाही करावी अशा सूचना तहसीलदार महेश सावंत यांना यावेळी आ.आशुतोष काळे यांनी दिल्या.