खरीप हंगामाचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे, खते उपलब्ध करून द्या- आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
मागील काहीवर्षीप्रमाणे याहीवर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणे व खतांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासणार असून त्यासाठी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांना वेळेत मुबलक बियाणे व खते उपलब्ध करून द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कृषी विभागाला दिल्या आहेत.आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.०५) रोजी कोपरगाव येथे पंचायत समिती कार्यालयात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक घेतली. या बैठकीत कोपरगाव विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील येणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्याबाबत त्यांनी कृषी विभागाला मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की,मागील पाच वर्षात २०२३ चा अपवाद वगळला तर दरवर्षी समाधनकारक पर्जन्यमान झाले आहे व कृषी विभागाने देखील आपली जबाबदारी चोखपणे पार पडल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी आल्या नाहीत. कृषी विभागाने जबाबदारीने दिलेल्या योगदानाची दखल घेवून राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे आयएसओ मानांकन मिळाल्याबद्दल त्यांनी कृषी विभागाचे कौतुक केले. ज्याप्रमाणे मागील वर्षी शासनाच्या विविध योजनांचा लाभ कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळवून दिला त्याप्रमाणेच याहीवर्षी जास्तीत जास्त शासनाच्या लाभाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळवून द्या. तसेच खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमा प्रभावीपणे राबवा. शेतकऱ्यांच्या मागणी प्रमाणे शेतकऱ्यांना खतांचा व बियाणांचा पुरवठा कसा होईल जेणेकरून शेतकऱ्यांच्या पेरण्या योग्य वेळेत होवून त्यांना चांगले उत्पन्न मिळेल व त्यांना जास्तीत जास्त आर्थिक फायदा कसा होईल याची काळजी घ्या.

मागील वर्षी झालेले पर्जन्यमान पाहता यावर्षी पाणी टंचाई जाणवणार नाही असा सर्वाचांच अंदाज होता परंतु फेब्रुवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता अधिकच जाणवू लागल्यामुळे सर्वांचेच अंदाज चुकले आहेत. त्यामुळे यापुढील काळात पाणी बचतीवर भर द्यावा लागणर आहे त्यासाठी पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याबाबत कृषी विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी.शेती उत्पन्न वाढविण्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सूचना येत असल्या तरी खर्चाचा ताळमेळ बसने गरजेचे आहे. विभक्त कुटुंब पद्धती त्यामुळे शेती क्षेत्र कमी होत चालले असून कमी क्षेत्रात शेतीची कोणकोणती औजारे घ्यायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत असतो त्यासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक शेती किंवा गट शेती पर्याय निवडणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. बियाणांच्या बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही, व शेतकऱ्यांच्या तक्रारी येणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत केल्या. याप्रसंगी काही शेतकऱ्यांना ट्रॅक्टर अवजाराची वाटप करण्यात येवून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुगृह अनुदान योजना अंतर्गत अनुदानाचे आदेश प्रमाणपत्र आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी विलास गायकवाड उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर, गटविकास अधिकारी संदीप दळवी, कृषी अधिकारी मनोज सोनवणे, सचिन कोष्टी कृषी अधिकारी पं.स. कोपरगाव, सर्व मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक कृषी सहाय्यक व शेतकरी आदी उपस्थित होते.